Pages

Monday, December 27, 2010

३१ डिसेंबर साजरा कसा कराल ?

आम्ही (म्हणजे सर्व तरुण मंडळी) ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता उठणार. उटणं वैगेरे लावून अंघोळ करणार. मग देवपूजा करणार. सकाळी सकाळी गायीचे सात्विक धारोष्ण दूध ग्लासफुल पिणार. मग पुढचे २ तास ज्ञानेश्वरी पठण. त्यानंतर आई वडिलांच्या पाया पडणार. मग त्यांना घेवून गावातल्या गणपतीच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाणार. तिथे मोठमोठ्याने अथर्वशीर्ष म्हणणार. गोरगरिबांना दानधर्म करून घरी परत येणार. घरी आल्यावर दुपारचा अल्पोपहार घेणार. साबुदाण्याची खिचडी , २ केळी, ४ खजूर आणि रताळ्याचा शिरा... बास्स!

नंतर घरीच विश्रांती घेवून संध्याकाळी ४ वाजता ह. भ. प. श्री निरंजन महाराज यांच्या प्रवचनाला हजेरी लावणार, ते हि शंकराच्या मंदिरात. संध्याकाळी शुभं करोति म्हणून महाभारताचे पारायण. संध्याकाळी ९ वाजता जेवण. बटाट्याची भाजी , २ चमचे श्रीखंड आणि ४ पुऱ्या. नंतर दूरदर्शनवर रात्री १२ पर्यंत मानवी जीवन आणि त्याचे महत्व या विषयावरील परिसंवाद याचा आस्वाद घेणार. शार्प १२ वाजता आई वडील , बहिण भाऊ , शेजारी पाजारी इत्यादी लोकांच्या पाया पडून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आणि झोपायला जाणार.

वरील सर्व आम्ही करू , असा तुमचा गोड गैरसमज असेल तर त्वरित दूर करावा , हि नम्र विनंती.

हॅपी न्यू इयर!

*भूषण*

Saturday, March 27, 2010

विरक्ती आणि सुख दु:ख

सुख हे मानण्यात आहे ... मग ते कशातही मिळू शकेल ... विरक्ती म्हणजे स्थितप्रज्ञता ... अगदी एखाद्या गाढवाप्रमाणे ... जे आंब्याची साल आणि कागद एकाच चवीने खाते.....
पूर्ण विरक्ती प्राप्त झालेल्या माणसास जगातील सुख दु:खाचे काही घेणे देणे नसते ... एक गोष्ट सांगण्याचा मोह टाळता येत नाहीये .... बहुतेक बऱ्याच जणांना माहित असावी ... पण कोणी ना कोणी नवीन वाचणारा असेलच ...

"एकदा एक संन्यासी गुरु आणि शिष्य पायी प्रवास करीत असतात. वाटेत एक नदी लागते. नदीला पूर आलेला असतो. नदीच्या काठावर एक स्त्री रडत बसलेली असते. गुरु तिची विचारपूस करतो. तिला काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी नदी पार करायची असते, परंतु पुरामुळे तिला ते शक्य नसते ... गुरु तिला म्हणतो "तू माझ्या खांद्यावर बैस मी तुला नदी पार करून देतो ..." त्याप्रमाणे ती त्या संन्यासी गुरूच्या खांद्यावर बसते आणि नदी पार करते.... गुरु शिष्य पुढचा मार्ग धरतात. पण शिष्याच्या मनात नवीन प्रश्न घोळू लागतो . संन्यासी असलेल्या माझ्या गुरूने असे का करावे ??? हा प्रश्न त्याला भेडसावू लागतो. ... चांगले १० १२ मैल चालल्यावर शिष्य गुरूला विचारतो "गुरुजी , आपण संन्यासी लोक , आपल्याला स्त्रीस्पर्ष वर्ज्य ... तरीही तुम्ही त्या स्त्रीला खांद्यावर कसे काय घेतलेत ???" गुरु उत्तर देतात "अरे शिष्या, मी तिला तिथेच नदीपार सोडले ... तू तर तिला इथवर घेऊन आलास "........

या गुरु सारखी विरक्ती मिळणे महाकठीण ... माझ्या म्हणण्याचा मतीत अर्थ असा कि विरक्त माणसाला ना सुख असते ना दु:ख ....

आधी विरक्ती ची गरज का आहे ते पाहू ...
आयुष्यातल्या लहान सहान गोष्टींवरून आनंदी किंवा दु:खी होणारे आपण सर्व भौतिक गोष्टींमध्ये गुरफटलेले आहोत. आपली स्वप्नं, आपली ध्येये आपल्या भोवतालच्या जगाशी निगडीत असतात. परंतु जो मनुष्य ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवतो त्याच्या सुख दु:खाच्या व्याख्या बदलतात. तो भौतिक गोष्टींच्या वर विचार करू लागतो ...
(आता म्हणाल ईश्वरप्राप्ती चे ध्येय च का ठेवावे ??? ... कारण यात चिरंतन समाधान आहे ... जे कधीही कमी होत नाही ...जे भौतिक जाणीवेला कितीतरी मागे सोडते )
(आता विचाराल चिरंतन समाधान म्हणजे सुख च ना ??? तर हो ... ते सुखच ... पण कधीही न संपणारे ... दु:खाचा लवलेश ही न शिवणारे )
आज माझ्या घरी चारचाकी आली ... मला आनंद झाला , माझ्या कुटुंबियांना आनंद झाला .... ही एक भौतिक स्टेप ...
उद्या माझ्या शेजाऱ्याने माझ्यापेक्षा चांगली चारचाकी घेतली ... मला मत्सर वाटला ... ही पण भौतिक स्टेप ... पण जर मलाही आनंद झाला ... तर मी भौतिकता थोडी सोडली आणि विरक्तीच्या दिशेने पावूल टाकले .....
अशीच स्टेप बाय स्टेप प्रगती विरक्ती मध्ये होते ... डायरेक्ट विरक्ती येणे अशक्य ... किंवा गुरूचा अनुग्रह तरी असावा लागतो.
***
परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावर मनुष्यास विरक्ती येते ... पण साक्षात परमेश्वराला विरक्तीची काय गरज ??? तो म्हणाल तर विरक्त म्हणाल तर १६००० स्त्रियांचा पती .... जिथे अर्जुनासारखा नर ईश्वराचे महारूप पाहून गोंधळला तिथे आपण कीस झाड कि पत्ती????


***

स्वामी बाबा बंगाली भूषण

पुण्यात आय पी एल

(कल्पना करू कि सदाशिव पेठे नावाचा पुणेरी फलंदाज आय पी एल मध्ये खेळत आहे)

कोलकाता विरुद्ध पुणे असा पुण्यात सामना सुरु आहे. सदाशिव तुच्छतेने बॉलर कडे पाहतो आणि आकाशाकडे पाहून उद्गारतो "छ्या , काय ऊन आहे?? "
सदाशिव हनुमानाच्या गदेप्रमाणे फळी खांद्यावर ठेवून चौफेर नजर फिरवतो . चीअरलीडर्स शांत बसल्या आहेत. प्रेक्षक सदाच्या चौकाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना स्कोरची चिंता नसून चीअरलीडर्स चा नाच पाहायचा आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव सदाच्या पुणेरी मनाने घेतलेला आहे. बॉलर बॉल टाकतो , सदाशिव द्रविड ष्टाईल चेंडूला आदर दाखवतो . प्रेक्षकातला एकजण "अरे, ह्या फलंदाजाला आउट करा रे" ... दुसरा आंबटशौकीन "आयला, हा फलंदाज चीअरलीडर्स सोडून चेंडूची पप्पी का घेतोय ?" ... तिसरा " हा सद्या पोरी पाहूनही पेटत नाहीये "

बॉलर दुसरा चेंडू टाकतो. सदा जोरदार चेंडू फटकावतो. समोरून दुसरा फलंदाज धाव घेण्यासाठी पळत येतो ... सदा त्याला थांबण्याचा इशारा करतो आणिम्हणतो "अरे थांब , वेडा आहेस का ? आता १ वाजलाय, धावा ४ वाजल्यानंतर "

बॉलर तिसरा चेंडू टाकतो. चेंडू बराच ऑफ साईड ऑफ स्टंप असल्याने सदा चेंडू सोडून देतो. मोठ्या आशेने अम्पायर कडे पाहतो. अम्पायर स्तब्ध. सदा अंपायरच्या दिशेने जातो. (सुदैवाने अम्पायर देशी असतो पण सदाच्या दुर्दैवाने मराठी नसतो ) अरे अम्पायर , वो वाईड बॉल कायको नही दिया ? स्टंप के दीड हात लांब से गया. वाटल्यास तिसरे अम्पायर से पुछो ना ??? (अम्पायर त्याला जागेवर जाऊन फलंदाजी करण्यास सांगतात ) सदा दुसऱ्या फलंदाजाकडे पाहून अम्पायरला उद्देशून म्हणतो "हे बेनं गंडलय राव "

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...

आज आम्ही आपल्याशी "मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D  द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV  वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV  चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही.

दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad  ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो.  म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात.  चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा  समजणार नाही.

तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!!  इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी.  कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ??? ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!!

चौथा प्रकार   "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात.  

महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.