Pages

Sunday, March 6, 2011

चिंटू उवाच: 

मला आजकाल अजिबात गंमत येत नाही. माझ्या शाळेत माझे २ मित्र आहेत. एकाचं नाव आहे "सामसूम सखा" (सलीम खान) आणि दुसरा आहे "पक्या (प्याट्रिक) पिस्तुल". एकदा काय झालं आम्ही डब्बे खात बसलेलो. मी आहे शाकाहारी. माझ्या डब्यात होती मटार उसळ, सामसूमने आणला होता खिमा , आणि पिस्तुलने आणलं होतं पोर्क पॅटीस. माझ्यासाठी फक्त वन वे होता. मटार एके मटार , पण दोघे शिंचे माझीच मटार उडवत होते. सामसूम कडे टू वे होता. मटार प्लस खिमा. साला पिस्तुल फुल तिन्ही बाजूने हाणत होता. मी मनातल्या मनात बाप्पाला म्हणालो,"अनहोनी को होनी कर दे , होनी को अनहोनी , एक जगह जब जमा हो तीनो .... चिंटू , सखा , पिस्तुली "

मला हे अजिबात आवडलं नाही. मुले म्हणजे देवाघरची फुले, ओह सॉरी ... मुले म्हणजे अल्लाह के फरिश्ते ... अरे असंपण नाही, मुले म्हणजे सँटाचे लाडके एंजल्स. मी भयंकर कन्फ्युज झालेलो आहे. मी दिवसभर विचार करत होतो. मिनीच्या फुटकळ कवितापण शांतपणे ऐकल्या तर बगळ्याने माझ्या गळ्याला हात लावून मला ताप तर नाही ना ? हे चेक केलं. मी पूर्ण संध्याकाळ मनोजकुमार स्टाइलमध्ये तोंड लपवून विचार करत होतो. पालकाची भाजीसुद्धा खाल्ली. (आईने विचारलं "प्रगतीपुस्तक मिळालं काय ?" तर मी तिच्यावर हळूच रागावलो. "आय एम अ ग्रोन अप कीड मॉम." असं तिला थोडसं ठणकावून सांगितलं)  

मी तसाच झोपलो. झोपेत अचानक मी तरंगू लागलो. एक मोठा प्रकाशझोत आला आणि मी त्याच्यात शिरलो. मी गपकन डोळेच मिटले. डोळे उघडले तेंव्हा मी एका मस्त बागेत होतो. तिथे एक टेबल होतं. चार खुर्च्या होत्या. मी घाबरलो होतो जाम. एका खुर्चीवर जावून बसलो. इतक्यात तिथे एक काळा माणूस आला. मस्त टाय , कोट , प्यांट घातलं होतं त्याने. मला म्हणतो कसा ... चिंटू , कॉफी घेणार का ? मी म्हणालो , बिस्कीट देणार असाल तर पितो. पार्ले आणि मारी सोडून ... मी माझ्या कंडीशंस अप्लाय केल्या. तो हसला आणि कॉफी बनवू लागला. इतक्यात तिथे  एक यमी पेक्षा सहापट गोरा असा माणूस आला. धोतर आणि कुडता असला पोशाख केला होता. त्याने माझ्यासाठी क्रीमची बिस्किटे आणली होती. मी या ब्ल्याक अँड व्हाईट मध्ये अडकलो होतो इतक्यात सांता क्लॉजचे कपडे घालून एक निमगोरा माणूस आला. मला म्हणतो कसा "काय चिंटू , कसं काय ? मस्त ना?"

मी जाम घाबरलो होतो. मला असलं काही बघायची सवय नव्हती. मी चाचरत विचारलं तुम्ही कोण आहात सगळे ? मी कुठे आहे? तो काळा मनुष्य म्हणाला , अरे तू एका पारलौकिक बागेत आहेस. (जोशीकाकू आजच जोशीकाकांना "पारलौकिक झोपेतून जागे व्हा" असं ओरडत होत्या ... म्हणजे काय ते माहित नाही.) तो म्हणाला "अरे आम्ही तेच तिघे ... अनहोनी को होनी कर दे वाले" मी म्हणालो "अच्छा, म्हणजे तुम्ही पिस्तुलचे पप्पा काय ?" इतक्यात तो सांता क्लॉज म्हणाला "अरे नाही रे येड्या , मी पैगंबर , तो टाय कोट वाला कृष्ण आणि हा काष्टा धोतरवाला येशू" मी तीनताड उडालो. "व्हाट द हेक म्यान " (पप्पांची लाईन रिपीट केली. म्हणजे काय ते त्यांना विचारा.)

तिघे हसू लागले. मला माझ्यावर कुणीही हसलेलं आवडत नाही. मी तडक म्हणालो "हे बघा, मला काही प्रश्न विचारायचे आहेत.विचारू विचारू ???" तर येशुकाका म्हणाले विचार विचार ... मी एका दमात विचारलं " मला सांगा तुम्ही तीन वेगळे वेगळे धर्म स्थापन का केले ? एकाने पोर्क खायचा नाही , एकाने शाकाहारी राहायचा , एकाला दिसेल तो प्राणी पकडून खाण्याची मुभा ??? अशाने माझा डब्बा लवकर संपतो माहिते का तुम्हाला ? माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम निर्माण केलेत तुम्ही ! , तुम्ही जिवंत असताना तुमच्याकडे होतीच पारलौकिक का काय ती शक्ती होती  तर एका धर्मात यायचं ना? आय टेल यु ... यु गाईज गॉट अ बिग इगो. माझे फॉलोअर्स, माझे फॉलोअर्स करत खेळ होतो तुमचा , जीव जातो आमचा ( बेडकाची गोष्ट वेळेवर आठवली) इथे एकमेकांचे कपडे घालून दाखवताय "खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे" पण रियलमध्ये "खरा तो माझाच धर्म , जगाला आपल्या धर्मात आणावे" असलं चालू आहे. आय टेल यु ... आय एम सिक ऑफ इट म्यान! तुम्ही पूर्ण जगाला एकाच धर्मात आणणार असाल तर मी चिंटू खान / चिंटू कुलकर्णी / चिंटू डिसोजा व्हायला पण तयार आहे. बोला आहात तयार ???? ते तिघे गप्प होते. शेवटी मी उपाशी राहतो यार मधल्या सुट्टीत. असं म्हणून मी तिथून तडक निघालो.

डोळे उघडले तेंव्हा आईने मला बाथरूम मध्ये उभं केलं होतं. मी तिला साफ सांगितलं "मला इथून पुढे सानेगुरुजी वाचायला देवू नकोस प्लीज , सगळं कन्फ्युजन"
 
*******
चिंटू

Monday, December 27, 2010

३१ डिसेंबर साजरा कसा कराल ?

आम्ही (म्हणजे सर्व तरुण मंडळी) ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता उठणार. उटणं वैगेरे लावून अंघोळ करणार. मग देवपूजा करणार. सकाळी सकाळी गायीचे सात्विक धारोष्ण दूध ग्लासफुल पिणार. मग पुढचे २ तास ज्ञानेश्वरी पठण. त्यानंतर आई वडिलांच्या पाया पडणार. मग त्यांना घेवून गावातल्या गणपतीच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाणार. तिथे मोठमोठ्याने अथर्वशीर्ष म्हणणार. गोरगरिबांना दानधर्म करून घरी परत येणार. घरी आल्यावर दुपारचा अल्पोपहार घेणार. साबुदाण्याची खिचडी , २ केळी, ४ खजूर आणि रताळ्याचा शिरा... बास्स!

नंतर घरीच विश्रांती घेवून संध्याकाळी ४ वाजता ह. भ. प. श्री निरंजन महाराज यांच्या प्रवचनाला हजेरी लावणार, ते हि शंकराच्या मंदिरात. संध्याकाळी शुभं करोति म्हणून महाभारताचे पारायण. संध्याकाळी ९ वाजता जेवण. बटाट्याची भाजी , २ चमचे श्रीखंड आणि ४ पुऱ्या. नंतर दूरदर्शनवर रात्री १२ पर्यंत मानवी जीवन आणि त्याचे महत्व या विषयावरील परिसंवाद याचा आस्वाद घेणार. शार्प १२ वाजता आई वडील , बहिण भाऊ , शेजारी पाजारी इत्यादी लोकांच्या पाया पडून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आणि झोपायला जाणार.

वरील सर्व आम्ही करू , असा तुमचा गोड गैरसमज असेल तर त्वरित दूर करावा , हि नम्र विनंती.

हॅपी न्यू इयर!

*भूषण*

Saturday, March 27, 2010

विरक्ती आणि सुख दु:ख

सुख हे मानण्यात आहे ... मग ते कशातही मिळू शकेल ... विरक्ती म्हणजे स्थितप्रज्ञता ... अगदी एखाद्या गाढवाप्रमाणे ... जे आंब्याची साल आणि कागद एकाच चवीने खाते.....
पूर्ण विरक्ती प्राप्त झालेल्या माणसास जगातील सुख दु:खाचे काही घेणे देणे नसते ... एक गोष्ट सांगण्याचा मोह टाळता येत नाहीये .... बहुतेक बऱ्याच जणांना माहित असावी ... पण कोणी ना कोणी नवीन वाचणारा असेलच ...

"एकदा एक संन्यासी गुरु आणि शिष्य पायी प्रवास करीत असतात. वाटेत एक नदी लागते. नदीला पूर आलेला असतो. नदीच्या काठावर एक स्त्री रडत बसलेली असते. गुरु तिची विचारपूस करतो. तिला काही अत्यंत महत्वाच्या कामासाठी नदी पार करायची असते, परंतु पुरामुळे तिला ते शक्य नसते ... गुरु तिला म्हणतो "तू माझ्या खांद्यावर बैस मी तुला नदी पार करून देतो ..." त्याप्रमाणे ती त्या संन्यासी गुरूच्या खांद्यावर बसते आणि नदी पार करते.... गुरु शिष्य पुढचा मार्ग धरतात. पण शिष्याच्या मनात नवीन प्रश्न घोळू लागतो . संन्यासी असलेल्या माझ्या गुरूने असे का करावे ??? हा प्रश्न त्याला भेडसावू लागतो. ... चांगले १० १२ मैल चालल्यावर शिष्य गुरूला विचारतो "गुरुजी , आपण संन्यासी लोक , आपल्याला स्त्रीस्पर्ष वर्ज्य ... तरीही तुम्ही त्या स्त्रीला खांद्यावर कसे काय घेतलेत ???" गुरु उत्तर देतात "अरे शिष्या, मी तिला तिथेच नदीपार सोडले ... तू तर तिला इथवर घेऊन आलास "........

या गुरु सारखी विरक्ती मिळणे महाकठीण ... माझ्या म्हणण्याचा मतीत अर्थ असा कि विरक्त माणसाला ना सुख असते ना दु:ख ....

आधी विरक्ती ची गरज का आहे ते पाहू ...
आयुष्यातल्या लहान सहान गोष्टींवरून आनंदी किंवा दु:खी होणारे आपण सर्व भौतिक गोष्टींमध्ये गुरफटलेले आहोत. आपली स्वप्नं, आपली ध्येये आपल्या भोवतालच्या जगाशी निगडीत असतात. परंतु जो मनुष्य ईश्वरप्राप्तीचे ध्येय ठेवतो त्याच्या सुख दु:खाच्या व्याख्या बदलतात. तो भौतिक गोष्टींच्या वर विचार करू लागतो ...
(आता म्हणाल ईश्वरप्राप्ती चे ध्येय च का ठेवावे ??? ... कारण यात चिरंतन समाधान आहे ... जे कधीही कमी होत नाही ...जे भौतिक जाणीवेला कितीतरी मागे सोडते )
(आता विचाराल चिरंतन समाधान म्हणजे सुख च ना ??? तर हो ... ते सुखच ... पण कधीही न संपणारे ... दु:खाचा लवलेश ही न शिवणारे )
आज माझ्या घरी चारचाकी आली ... मला आनंद झाला , माझ्या कुटुंबियांना आनंद झाला .... ही एक भौतिक स्टेप ...
उद्या माझ्या शेजाऱ्याने माझ्यापेक्षा चांगली चारचाकी घेतली ... मला मत्सर वाटला ... ही पण भौतिक स्टेप ... पण जर मलाही आनंद झाला ... तर मी भौतिकता थोडी सोडली आणि विरक्तीच्या दिशेने पावूल टाकले .....
अशीच स्टेप बाय स्टेप प्रगती विरक्ती मध्ये होते ... डायरेक्ट विरक्ती येणे अशक्य ... किंवा गुरूचा अनुग्रह तरी असावा लागतो.
***
परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावर मनुष्यास विरक्ती येते ... पण साक्षात परमेश्वराला विरक्तीची काय गरज ??? तो म्हणाल तर विरक्त म्हणाल तर १६००० स्त्रियांचा पती .... जिथे अर्जुनासारखा नर ईश्वराचे महारूप पाहून गोंधळला तिथे आपण कीस झाड कि पत्ती????


***

स्वामी बाबा बंगाली भूषण

पुण्यात आय पी एल

(कल्पना करू कि सदाशिव पेठे नावाचा पुणेरी फलंदाज आय पी एल मध्ये खेळत आहे)

कोलकाता विरुद्ध पुणे असा पुण्यात सामना सुरु आहे. सदाशिव तुच्छतेने बॉलर कडे पाहतो आणि आकाशाकडे पाहून उद्गारतो "छ्या , काय ऊन आहे?? "
सदाशिव हनुमानाच्या गदेप्रमाणे फळी खांद्यावर ठेवून चौफेर नजर फिरवतो . चीअरलीडर्स शांत बसल्या आहेत. प्रेक्षक सदाच्या चौकाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना स्कोरची चिंता नसून चीअरलीडर्स चा नाच पाहायचा आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव सदाच्या पुणेरी मनाने घेतलेला आहे. बॉलर बॉल टाकतो , सदाशिव द्रविड ष्टाईल चेंडूला आदर दाखवतो . प्रेक्षकातला एकजण "अरे, ह्या फलंदाजाला आउट करा रे" ... दुसरा आंबटशौकीन "आयला, हा फलंदाज चीअरलीडर्स सोडून चेंडूची पप्पी का घेतोय ?" ... तिसरा " हा सद्या पोरी पाहूनही पेटत नाहीये "

बॉलर दुसरा चेंडू टाकतो. सदा जोरदार चेंडू फटकावतो. समोरून दुसरा फलंदाज धाव घेण्यासाठी पळत येतो ... सदा त्याला थांबण्याचा इशारा करतो आणिम्हणतो "अरे थांब , वेडा आहेस का ? आता १ वाजलाय, धावा ४ वाजल्यानंतर "

बॉलर तिसरा चेंडू टाकतो. चेंडू बराच ऑफ साईड ऑफ स्टंप असल्याने सदा चेंडू सोडून देतो. मोठ्या आशेने अम्पायर कडे पाहतो. अम्पायर स्तब्ध. सदा अंपायरच्या दिशेने जातो. (सुदैवाने अम्पायर देशी असतो पण सदाच्या दुर्दैवाने मराठी नसतो ) अरे अम्पायर , वो वाईड बॉल कायको नही दिया ? स्टंप के दीड हात लांब से गया. वाटल्यास तिसरे अम्पायर से पुछो ना ??? (अम्पायर त्याला जागेवर जाऊन फलंदाजी करण्यास सांगतात ) सदा दुसऱ्या फलंदाजाकडे पाहून अम्पायरला उद्देशून म्हणतो "हे बेनं गंडलय राव "

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ...

आज आम्ही आपल्याशी "मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D  द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV  वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV  चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही.

दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad  ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो.  म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात.  चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा  समजणार नाही.

तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!!  इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी.  कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ??? ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!!

चौथा प्रकार   "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात.  

महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.

Saturday, December 13, 2008

मी मराठी ... आणि माझे मराठीपण...

मराठी असल्याची जाणीव होण्यासाठी महाराष्ट्र सोडावा लागतो ... हा साक्षात्कार मला अमेरिकेत झाला. वयाची २२ वर्षे महाराष्ट्रात आणि विशेष करून पुण्यात काढली. इंजिनियरिंग कौलेजत प्राध्यापकांची आडनावे देव, नार्खेडे, धान्डे, हळबे अशी असल्याने माझ्यासाठी इंग्रजी म्हणजे परीक्षेतल्या पेपरावर ओकण्याची भाषा होती. मित्रमंडळात गानू, शेंडे, वाटवे, पुण्यात आयुष्य गेलेला व १ २ ३ मराठीत मोजणारा बंगाली कम मराठी "सेन" असे मित्र.

मुळात माझे शिक्षण मराठी माध्यमातले. त्यमुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांसारखे ही ही ही हा हा हा यु नो असले कधी जमलेच नाही. नीट नेटके राहणार्‍या या श्रीमंत इंग्रजी माध्यमाच्या मुलांकडे पाहून माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. पण अमेरिकेत आल्यापासून या नाटकि तर्हा शिकून घेतल्या आहेत. सकाळी तोंडावर हसू आणि गुड मॉर्निंग याची आता चांगलीच सवय झाली आहे. ३ ते ४ वर्षापूर्वी सकाळी कोणी चुकुन गुड मॉर्निंग म्हणाले तर "हाड तिच्या मायला" असे सर्वांगसुंदर उत्तर आमच्या श्रिमुखातून निघत असे.

आता बे एरिया येथे एका तेलगु मुलाबरोबर नोकरी निमित्त वास्तव्य आहे. त्याचे बरेच मित्र रूम वर येत असतात. त्यांच्या बरोबर चित्रपट पहाणे, फिरणे असे दिनक्रम चालू असतात. हे तेलगु लोक इथे एकत्र रहातात. किंबहुना मराठी लोकांपेक्षा जास्त एकत्र दिसतात. एक दिवस माझा तेलगु मित्र प्रकाश मला म्हणाला, " आज बोले तो मेरा हैदराबादी दोस्त घरपे आ रा, फिल्म देखेंगे, डिनर बाहर करते, तुम खुश होणा उससे मिल्के, वो महाराष्ट्रीयन होणा, उसका सरनेम अप्सिन्घेकर होणा " मलाही थोडी उत्सुकता लागली. कोण हा मराठी आणि या हैदराबादी ला का भेटायला येतोय.

तो आला. आणि त्याने अनाकलनीय अशा तेलगु भाषेत बोलायला सुरवात केली. प्रकाश ने आमची ओळख करून दिली. मीच त्याला नाव गाव काम वैगेरे इंग्रजीतून विचारले. नंतर हळूच विचारल "मराठी येता का ? " तो म्हणाला "हो तर, आम्ही घरी मराठीच बोलतो. माझ्या लहानपणीच बाबा हैदराबाद ला शिफ्ट झाले. त्यामुळे घरी मराठी आणि बाहेर तेलगु ". त्याच्या तोंडून मराठी ऐकून मला थोडा बर वाटल. नंतर चित्रपटाला जाण्यासाठी आम्ही कार मध्ये जाऊन बसलो. प्रकाश गाडी चालवत होता. मी त्याच्या शेजारी आणि मागे अप्सिन्घेकर. १५ - २० मिनिटे गेली. आणि प्रकाश एकदम म्हणाला" तुम लोगा अपनी भाषा मे बोलो" आणि माझ्याकडे पाहून म्हणाला "तुम नॉर्थ इंडियन लोगा बहूत शरमाते" आणि ताबडतोब माझ्या तोंडातून निघून गेले " Prakash.... for you, I am north indian...but for me, north india is different"

त्याच क्षणी मला माझ्या अस्तित्वाची, मराठीपणाची जाणीव झाली. अस वाटल, मलाही भाषिक अस्तित्व आहे.
मी मराठी म्हणजे काही विशेष भाषिक वारसा घेऊन आलो आहे. आणि त्याच वेळि थोडा अभिमान ही वाटला ...
मराठी होण्याचा.... त्या वेळि हे असा का वाटल हे मलाही नाही समजल.... पण ती जाणीव फार हृदय स्पर्शी झाली.

त्यानंतर आम्ही चित्रपट गृहात पोहोचलो. त्या दोघां नि तेलगु चित्रपटाचे तिकीट काढले.
मी त्यांच्या बरोबर आहे याची जास्त पर्वा केली नाही. मीही हिंदी चित्रपटाचे वेगळे तिकीट काढले. आणि हिंदी सिनेमालाजाऊन बसलो.
रात्री जेवण बाहेरच घेतल. जेवताना पूर्ण वेळ दोघांची बड्बड चालली होती अर्थात त्यांच्या भाषेत.
प्रकाशाचा मित्र मराठी असून तेलगु संस्कृतीत किती मुरला आहे ते दिसल. जेवताना माझ्याशी तो तसा कमीच बोलला.
त्याने पुण्यातील नाटकांबद्दल विशेष कुतुहुल दाखविले. "आजूनही पुण्यात नाटके चालतात का ?" असे विचारले. त्याने सांगितले " माझ्या काका न्नी शांतेचा कार्ट चालू आहे या नाटकात छोटि भूमिका केली होती. " मला साहजिकच आश्चर्य वाटल.
म्हणजे आजुन ही तो मराठीशी जवळीक साधून होता. पणत्याच्या तेलगु संस्कृतीत पूर्ण रमलेला.

नंतर घरी जाताना मी गाडीत विचार करू लागलो. हा महाराष्ट्रीयन असून दुसर्या प्रांतात , दुसर्या भाषेत रमला.
तसेच बाहेरचे लोक महाराष्ट्रात येतात आणि आपला प्रांत समजून रहातात. बंगाली, गुजराती, कानडी, मारवाडी आपल्या राज्यात येतात
आणि आपली मराठी शिकतात व बोलतात. शुद्ध मराठी नाही आले तरी त्यांच्या भाषेच्या ढन्गात बोलतात. पण प्रयत्न करतात.
त्यांच्या बोलण्यातली कानडी, मारवाडी किंवा सिंधीआपल्याला जाणवते. पण तुम्ही निरीक्षण केले आहे का ??
मराठी भाषेला बिहारी ढन्ग कधी पाहण्यात नाही आला. याचा अर्थ बिहारी लोक महाराष्ट्राला आपला प्रांत मनात नाहीत. मी राज ठाकरे समर्थक नाही आहे
पण त्यांच्या बोलण्यात काही तरी सत्य आहे. .....नाही का ????????????????

आनंदाची व्याख्या ...आजपर्यंतची

शनिवारी सकाळ होते बारा वाजता....उठल्यावर आधी विचार येतो "का ऊठ्लो???" मग आवरून झाले की आपोआप पाऊले वळतात गाडीकडे . रूम मेट चे ही आवरून झालेले असते. बाकीच्या मित्रान ना फोन करण्याचे काम ही तोच करतो. आणि नंतर नेहमीचाच ठिकाण ठरते. पक्वान बिर्यानी हाउस..... एक पूर्ण प्लेट मटन बिर्यानी प्रत्येकी एक प्लेट उडवली जाते. नंतर एका दमात मँगो लास्सी संपवण्याची शर्यत. त्या अगडबंब पोटवरून हात फिरवून एक मोठी ढेकर दिली की शनिवार सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.

यानंतर बाळु ला शुक्रवारी रिलीज झालेल्या एखाद्या चित्रपटाची आठवण होते. रीतसर तिकिटे काढली जातात. तोपर्यंत एक चहा होतो. चित्रपटात हाणामारि असेल तर उत्तम. आम्हालाही डोके शून्यावर ठेवून चित्रपट पाहायचा असतो. (आमच्या सर्वान चा आवडता चित्रपट आहे मिथुन अभिनीत "गून्डा" कधी पाहून बघा... ) सन्ध्याकाळि मग फिरण्याचे प्लान्स. जिथे जास्त दंगा करता येईल अशी ठिकाणे. आणि रात्री नाइट क्लब्स नाहीतर पब्स. आमच्यातला कुणीही दारू पीत नाही पण उन्हळा की हिवळा याचा विचार न करता डोळे शेकणे हा प्रकार केला जातो.

मग काय !!! रात्री १२ - १ ला घरी आणि मस्त ताणून देणे. दुसरा पूर्ण दिवस बिच्छाण्यावर लोळत काढणे अथवा कुठेतरी फिरायला जाणे असा निघून जातो. परत पुन्हा येतो सोमवार आणि रूटिन चालू... शुक्रवार पर्यंत... अगदी १२ १२ तास काम करणे. कामाशीवाय (औफिसच्या) दुसरा विचार नाही.

वरचा प्रत्येक वाक्य खोडून काढण्याची ताकत संपूर्ण जगात फक्त एका स्त्री ची आहे. पहा कस ते.....

wait for part 2