चिंटू उवाच:
मला आजकाल अजिबात गंमत येत नाही. माझ्या शाळेत माझे २ मित्र आहेत. एकाचं नाव आहे "सामसूम सखा" (सलीम खान) आणि दुसरा आहे "पक्या (प्याट्रिक) पिस्तुल". एकदा काय झालं आम्ही डब्बे खात बसलेलो. मी आहे शाकाहारी. माझ्या डब्यात होती मटार उसळ, सामसूमने आणला होता खिमा , आणि पिस्तुलने आणलं होतं पोर्क पॅटीस. माझ्यासाठी फक्त वन वे होता. मटार एके मटार , पण दोघे शिंचे माझीच मटार उडवत होते. सामसूम कडे टू वे होता. मटार प्लस खिमा. साला पिस्तुल फुल तिन्ही बाजूने हाणत होता. मी मनातल्या मनात बाप्पाला म्हणालो,"अनहोनी को होनी कर दे , होनी को अनहोनी , एक जगह जब जमा हो तीनो .... चिंटू , सखा , पिस्तुली "
मला हे अजिबात आवडलं नाही. मुले म्हणजे देवाघरची फुले, ओह सॉरी ... मुले म्हणजे अल्लाह के फरिश्ते ... अरे असंपण नाही, मुले म्हणजे सँटाचे लाडके एंजल्स. मी भयंकर कन्फ्युज झालेलो आहे. मी दिवसभर विचार करत होतो. मिनीच्या फुटकळ कवितापण शांतपणे ऐकल्या तर बगळ्याने माझ्या गळ्याला हात लावून मला ताप तर नाही ना ? हे चेक केलं. मी पूर्ण संध्याकाळ मनोजकुमार स्टाइलमध्ये तोंड लपवून विचार करत होतो. पालकाची भाजीसुद्धा खाल्ली. (आईने विचारलं "प्रगतीपुस्तक मिळालं काय ?" तर मी तिच्यावर हळूच रागावलो. "आय एम अ ग्रोन अप कीड मॉम." असं तिला थोडसं ठणकावून सांगितलं)
मी तसाच झोपलो. झोपेत अचानक मी तरंगू लागलो. एक मोठा प्रकाशझोत आला आणि मी त्याच्यात शिरलो. मी गपकन डोळेच मिटले. डोळे उघडले तेंव्हा मी एका मस्त बागेत होतो. तिथे एक टेबल होतं. चार खुर्च्या होत्या. मी घाबरलो होतो जाम. एका खुर्चीवर जावून बसलो. इतक्यात तिथे एक काळा माणूस आला. मस्त टाय , कोट , प्यांट घातलं होतं त्याने. मला म्हणतो कसा ... चिंटू , कॉफी घेणार का ? मी म्हणालो , बिस्कीट देणार असाल तर पितो. पार्ले आणि मारी सोडून ... मी माझ्या कंडीशंस अप्लाय केल्या. तो हसला आणि कॉफी बनवू लागला. इतक्यात तिथे एक यमी पेक्षा सहापट गोरा असा माणूस आला. धोतर आणि कुडता असला पोशाख केला होता. त्याने माझ्यासाठी क्रीमची बिस्किटे आणली होती. मी या ब्ल्याक अँड व्हाईट मध्ये अडकलो होतो इतक्यात सांता क्लॉजचे कपडे घालून एक निमगोरा माणूस आला. मला म्हणतो कसा "काय चिंटू , कसं काय ? मस्त ना?"
मी जाम घाबरलो होतो. मला असलं काही बघायची सवय नव्हती. मी चाचरत विचारलं तुम्ही कोण आहात सगळे ? मी कुठे आहे? तो काळा मनुष्य म्हणाला , अरे तू एका पारलौकिक बागेत आहेस. (जोशीकाकू आजच जोशीकाकांना "पारलौकिक झोपेतून जागे व्हा" असं ओरडत होत्या ... म्हणजे काय ते माहित नाही.) तो म्हणाला "अरे आम्ही तेच तिघे ... अनहोनी को होनी कर दे वाले" मी म्हणालो "अच्छा, म्हणजे तुम्ही पिस्तुलचे पप्पा काय ?" इतक्यात तो सांता क्लॉज म्हणाला "अरे नाही रे येड्या , मी पैगंबर , तो टाय कोट वाला कृष्ण आणि हा काष्टा धोतरवाला येशू" मी तीनताड उडालो. "व्हाट द हेक म्यान " (पप्पांची लाईन रिपीट केली. म्हणजे काय ते त्यांना विचारा.)
तिघे हसू लागले. मला माझ्यावर कुणीही हसलेलं आवडत नाही. मी तडक म्हणालो "हे बघा, मला काही प्रश्न विचारायचे आहेत.विचारू विचारू ???" तर येशुकाका म्हणाले विचार विचार ... मी एका दमात विचारलं " मला सांगा तुम्ही तीन वेगळे वेगळे धर्म स्थापन का केले ? एकाने पोर्क खायचा नाही , एकाने शाकाहारी राहायचा , एकाला दिसेल तो प्राणी पकडून खाण्याची मुभा ??? अशाने माझा डब्बा लवकर संपतो माहिते का तुम्हाला ? माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम निर्माण केलेत तुम्ही ! , तुम्ही जिवंत असताना तुमच्याकडे होतीच पारलौकिक का काय ती शक्ती होती तर एका धर्मात यायचं ना? आय टेल यु ... यु गाईज गॉट अ बिग इगो. माझे फॉलोअर्स, माझे फॉलोअर्स करत खेळ होतो तुमचा , जीव जातो आमचा ( बेडकाची गोष्ट वेळेवर आठवली) इथे एकमेकांचे कपडे घालून दाखवताय "खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे" पण रियलमध्ये "खरा तो माझाच धर्म , जगाला आपल्या धर्मात आणावे" असलं चालू आहे. आय टेल यु ... आय एम सिक ऑफ इट म्यान! तुम्ही पूर्ण जगाला एकाच धर्मात आणणार असाल तर मी चिंटू खान / चिंटू कुलकर्णी / चिंटू डिसोजा व्हायला पण तयार आहे. बोला आहात तयार ???? ते तिघे गप्प होते. शेवटी मी उपाशी राहतो यार मधल्या सुट्टीत. असं म्हणून मी तिथून तडक निघालो.
डोळे उघडले तेंव्हा आईने मला बाथरूम मध्ये उभं केलं होतं. मी तिला साफ सांगितलं "मला इथून पुढे सानेगुरुजी वाचायला देवू नकोस प्लीज , सगळं कन्फ्युजन"
*******
चिंटू